नागपूर, दिनांक -02/11/2024
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील मनुवादी विचारधारेवर आधारित भाजप प्रणित शिंदे सरकारने मोठा गाजावाजा करित मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. परंतु या योजनेत सहभाग झालेल्या युवक प्रशिक्षणार्थींना मानधनच मिळाले नाही आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात हे प्रशिक्षणार्थी मानधनापासून वंचित राहिल्याने यांची दिवाळी अंधारात गेली असल्याचे काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आरोप करित भाजप आणि शिंदे सरकारवर घनाघात केला.
तरुण पिढीच्या भविष्यासोबत राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार खेळत आहे. सरकार रोजगार आणि सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यापेक्षा आता प्रशिक्षणार्थी यांना मानधन ही देत नाही. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य तरुणाचे स्वप्न राज्य सरकारने पायाखाली तुडवले आहे. हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांचे सरकार नसून केवळ उद्योगपतीं आणि कंत्राटदाराचे स्वप्न पूर्ण करणारे सरकार असल्याची टीका यावेळी डॉ. राऊत यांनी केला.
या प्रशिक्षणार्थ्यांना मानधनासाठी राज्य सरकारने महास्वयमचे नवीन पोर्टल सुरु केले असून, त्यावर आस्थापनेच्या मार्फत लॉगइन करून हजेरी पत्रक अपलोड करण्याचे आदेश दिलेले होते. मात्र, प्रशासनात सुसूत्रता नसल्याने प्रशिक्षणार्थींना नाहक त्रासाचा समाना करावा लागत आहे. यात प्रशिक्षणार्थींचे प्रचंड हाल होत असल्याचे डॉ. राऊत म्हणालेत.