नागपूर : प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीई), नागपूर येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या संधींविषयी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रेरणादायी आणि संवादात्मक सत्रात टीसीएस युरोपच्या BFSI विभागाचे चीफ टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट अभिजित महांकाळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), तंत्रज्ञान, करिअर आणि जीवनातील प्रगतीचा प्रवास याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उद्योगविश्वात वेगाने होत असलेल्या बदलांची माहिती देत एआय आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन च्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला भविष्यसज्ज व्यावसायिक म्हणून घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या वैयक्तिक करिअर प्रवासातील संघर्ष, अनुभव आणि यशाच्या टप्प्यांविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने चर्चा केली. श्री महांकाळ यांनी टीसीएसच्या NQT आणि CodeVita यांसारख्या उपक्रमांची माहिती देताना विद्यार्थ्यांना या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) सारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचे महत्त्व, उद्योगक्षेत्रातील विविध भूमिका, जबाबदाऱ्या आणि उपलब्ध करिअर संधींबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, जिज्ञासा आणि सकारात्मक प्रतिसादामुळे संपूर्ण सत्र अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडले. एआयच्या युगात विद्यार्थ्यांची शिकण्याची, बदलांशी जुळवून घेण्याची आणि सतत प्रगती करण्याची तयारी पाहून समाधान वाटल्याचे अभिजित महांकाळ यांनी यावेळी सांगितले. या उपयुक्त आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सत्राच्या आयोजनासाठी पीसीईचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण धाले तसेच एलटीजेएसएसचे संचालक डॉ. विवेक ननोटी यांचे विशेष आभार मानण्यात आले. डॉ. (श्रीमती) सोनी चतुर्वेदी, डॉ. आशिष बी. जिरापूरे, डॉ. एस. गोलाईत आणि इतर प्राध्यापकांनीही सत्राच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिजित महांकाळ तसेच टीसीएस AAG टीममधील चेतन खुंकार यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
---
